आरटीओने नाकारले १३८० रिक्षाचालकांचे अर्ज

0
28

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनातर्फे रिक्षाचालकांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २४ हजार १४३ रिक्षाचालकांपैकी ६ हजार ३१२ रिक्षाचालकांनी आर्थिक मदत मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला आहे. मात्र, वाहन क्रमांक, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट आणि आधार क्रमांक ऑनलाईन अर्जामध्ये चुकीचे भरल्याने प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ)ने १ हजार 380 रिक्षाचालकांचे अर्ज नाकारले आहेत. रिक्षाचालकांना चुकीचा क्रमांक दुरुस्ती करण्यासह पुन्हा अर्ज करण्याची सूचना आरटीओकडून देण्यात आली आहे.

राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्याने रिक्षाचालकांना आर्थिक फटका बसला आहे. रिक्षाचालक दररोज कमवील तरच रोज खाईल अशी परिस्थिती आहे. रिक्षाचालकांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने परवानाधारकांना १५०० रुपये मदत जाहीर केली. १६ डिसेंबर २०१५ नंतरचे सर्व परवानाधारक अर्थसहाय्य योजनेचे लाभार्थी आहेत. त्यासाठी ऑनालाईन प्रणाली तयार करण्यात आली. मात्र, रिक्षाचालकांचे बँक खात्यांशी आधार लिंक नसणे, ओटीपी येण्यात अडचणी, कोड वारंवार विचारला जात आहे आदी तांत्रिक अडचणींमुळे अनेक रिक्षाचालकांची नोंदणी झालेली नाही. शिवाय, दीड हजार रुपये महागाईच्या तुलनेत खूप कमी असल्याने अनेक रिक्षाचालक ऑनलाईन अर्ज करण्यास टाळाटाळ करत आहेत. परिणामी, अवघ्या 30 टक्केच रिक्षाचालकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. आर्थिक मदत मिळवण्यासाठी योजनेचा लाभ रिक्षाचालकांनी घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.