औरंगाबाद मंडळातील ८६४ सदनिका वितरणासाठी ऑनलाईन सोडत संपन्न 

0
28

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) गृहबांधणीत यशस्वी प्रयोग केले आहेत. म्हाडाच्या पारदर्शक, विश्वासार्ह संगणकीय सोडतीमुळे सर्वसामान्य नागरिक गृहस्वप्नपूर्तीसाठी म्हाडाचा पर्याय प्राधान्याने निवडत आहेत. म्हाडा हा गृहनिर्मितीतील विश्वसनीय ब्रँड अधिक व्यापक करण्यावर शासनाचा भर आहे. त्यामुळेच म्हाडा व खासगी विकासकांच्या सहकार्याने संयुक्त भागीदारी प्रकल्पाद्वारे परवडणाऱ्या दरातील गृहनिर्मितीवर भर देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.

          म्हाडा औरंगाबाद मंडळातर्फे औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ८६४ सदनिकांच्या वितरणासाठी ऑनलाईन सदनिका सोडत गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आली. त्यावेळी आव्हाड बोलत होते.

         आव्हाड म्हणाले, म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे चिखलठाणा, नक्षत्रवाडी व ऑरिक सिटी  येथे ५ हजार ५०० परवडणाऱ्या सदनिकांचा आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच या तीनही ठिकाणी गृहनिर्मिती प्रकल्पाला प्रारंभ केला जाणार आहे. या माध्यमातून औरंगाबाद वासियांना म्हाडाच्या माध्यमातून परवडणारी घरे लवकरच उपलब्ध होतील, असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला.

           यावेळी पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, म्हाडाच्या पारदर्शक संगणकीय सोडत प्रणाली सोबतच, दर्जेदार घरे व उत्कृष्ट  सदनिका वितरण प्रक्रिया या सर्व बाबींनी सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जोपासला आहे. त्यामुळेच औरंगाबाद  मंडळाच्या ८६४ सदनिकांकरिता ८ हजार २२६ अर्ज प्राप्त झाले आहेत. सदनिका सोडतीला  मिळालेला उत्कृष्ट प्रतिसाद लक्षात घेता म्हाडाची घरे खऱ्या अर्थाने परवडणारी असल्याचे द्योतक आहे. म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अधिक परवडणारी घरे उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून वाळुंज (तिसगाव) येथे म्हाडाला १३ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे देसाई यांनी सांगितले. म्हाडाच्या सोडतीला मिळालेला प्रतिसाद बघता औरंगाबाद मंडळाने भविष्यात अधिक गृहनिर्माण प्रकल्प राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.