कन्हारगांव ठरले राज्यातील 50 वे अभयारण्य ; अधिसूचना जारी

0
19

चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगांव अभयारण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कन्हारगांव हे राज्यातील 50 वे अभयारण्य ठरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाच्या गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत कन्हारगांव अभयारण्य घोषित करण्यास मान्यता देण्यात आली होती.
व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित होण्यासाठी आणि वनसंपदेचे जतन व संवर्धन करण्यासाठी शासनाने हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निमित्ताने म्हटले आहे. विदर्भ ही देशाची व्याघ्र राजधानी मानली जाते. वाघांचे सुरक्षित स्थलांतर होणे आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास जपणे याला शासनाने नेहमीच प्राधान्य दिल्याचेही ते म्हणाले. याच भूमिकेतून कोल्हापूर ते कर्नाटक पर्यंतचा वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी पश्चिम घाटात 8 तर विदर्भात 2 अशा 10 संवर्धन राखीव क्षेत्राची घोषणाही शासनाने  याच बैठकीत केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
चंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्र तसेच वन्यजीव संपदेने ब्रिटीशांना सुद्धा भुरळ पाडली होती हा इतिहास आहे. येथ वाघ व इतर वन्यजीव मोठ्या प्रमाणात असल्याने वन्यजीवांच्या शिकारीसाठी ब्रिटीशांनी खास शूटिंग ब्लॉक घोषित केलेले होते. पूर्वी इंग्रज अधिकारी शिकारीसाठी यायचे, नंतरही बरेच राजे महाराजे शिकारीसाठी यायचे. या वनक्षेत्रातील कन्हारगांव, वामनपल्ली व देवई ही ब्रिटीशांचे ‘शुटींग ब्लॉक’ आता राज्य शासनाच्या निसर्ग संवर्धनाच्या धोरणामुळे ‘अभयारण्य’ म्हणून ओळखले जातील.