कृषी अभ्यासक्रमाचे शैक्षणिक सत्र एक एप्रिलपासून – अजित पवार

0
28

मुंबई : कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेची चौथी फेरी महाविद्यालयस्तरावर पार पडल्यानंतर यंदाचे कृषी अभ्यासक्रमाचे शैक्षणिक सत्र एक एप्रिलपासून सुरु होणार आहे. वीस-वीस आठवड्यांच्या दोन सत्रात येत्या डिसेंबरमध्ये शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्यात येणार आहे. नवीन कृषी शिक्षण धोरणांच्या आखणीसाठी तसेच यापुढे उच्च शिक्षणप्रवेशाच्या पात्रतेसाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) सोबतच बारावीच्या परीक्षेचे  गुणप्रमाण निश्चित करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी. या समितीने एक महिन्याच्या कालमर्यादेत दि. ३० एप्रिलपर्यंत शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

राज्यातील ‘प्रवेश प्रक्रिया व आगामी कृषी शिक्षण धोरणा’संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीची कृषी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रवेशप्रक्रियेची चौथी फेरी महाविद्यालस्तरावर करण्यात यावी. कृषी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करुन येत्या एक एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. यंदाचे कृषी अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यासाठी झालेला विलंब लक्षात घेऊन शैक्षणिक सत्रातील सुट्ट्या कमी करुन तसेच शैक्षणिक तासिका वाढवून वीस-वीस आठवड्यांच्या दोन सत्रात हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येणार आहे. यंदाचे शैक्षणिक वर्ष डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परिक्षेच्या (सीईटी) गुणांसह बारावी परीक्षेचे गुण ग्राह्य धरणे तसेच त्याच्या प्रमाणाची निश्चिती करण्यासाठी समितीचे गठण करण्यात यावे.