कोविडचा संसर्ग थोपविण्यासाठी नव्या उत्साहाने पूर्णपणे सज्ज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना ग्वाही 

0
42

मुंबई: गेल्या वर्षीप्रमाणे आता देखील कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पाऊले उचलण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी जेणेकरून लसीकरणाचा वेग वाढवता येईल तसेच हाफकिनला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळावी अशी विनंतीही ठाकरे यांनी केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांची सूचना लगेचच उचलून धरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात सर्व राज्यांमध्ये लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ व प्रोत्साहन देण्यात येईल असे जाहीर केले. देशातील काही राज्यातील वाढत्या कोविड संसर्गाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी यासंदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधले.

दररोज ३ लाखांपर्यंत लसीकरण करण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, लसीकरणासाठी ज्या केंद्रांची तयारी व क्षमता आहे अशा केंद्रांना किंवा रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी मिळावी. लसीकरणासाठी महाराष्ट्रात देखील अनेक खासगी रुग्णालयांनी नोंदणी केली आहे पण त्यापैकी किती जणांची प्रत्यक्ष तयारी आहे हे तपासून लसीकरण वाढविण्यात येईल. दररोज ३ लाखांपर्यंत लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येईल.