‘कौशल्य विकास रथ’ देणार कौशल्य विकास अन रोजगाराची माहिती

0
48

मुंबई : केंद्र आणि राज्य शासनामार्फत कौशल्य विकासासाठी कोणकोणते अभ्यासक्रम, योजना राबविल्या जातात, याचा लाभ मिळविण्यासाठी कोठे संपर्क साधावा, महास्वयम संकेतस्थळाद्वारे रोजगार कसा मिळवावा अशा विविध प्रश्नांसंदर्भात माहिती देण्यासाठी आता राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील 355 तालुक्यांमध्ये कौशल्य विकास रथाद्वारे जनजागृती केली जाणार आहे. याशिवाय कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांचे समुपदेशनही यामार्फत केले जाणार असून यासाठी तयार करण्यात आलेल्या 7 कौशल्य विकास रथांना झेंडा दाखवून कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकतामंत्री नवाब मलिक यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला.

सोच मल्टिपर्पज सोसायटीमार्फत आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या सहयोगातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय परिसरात हा कार्यक्रम झाला. यावेळी रथांच्या शुभारंभाबरोबरच ‘स्किल टू लाईव्हलिहूड कार्निव्हल’ या उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी पाटील, सोच मल्टिपर्पज सोसायटीच्या सचिव पल्लवी गांगुर्डे, मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. नॉमदेव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शुभारंभ करण्यात आलेले कौशल्य विकास रथ हे राज्यातील 355 तालुक्यांमध्ये गावोगावी फिरुन जनजागृती करतील. यामध्ये प्रामुख्याने रोजगार उपलब्धतेसाठीचे https://www.mahaswayam.gov.in वेबपोर्टल, ०८०४६८७८३८१ हा टोल फ्री मिस्ड कॉल क्रमांक यांची माहिती दिली जाणार आहे. महास्वयम् वेबपोर्टलवरुन विविध कंपन्या, कॉर्पोरेट्स यांमध्ये रोजगार मिळू शकतो. यासाठी नोंदणी कशी करावी, कागदपत्रे कशी भरावीत आदींसंदर्भात बेरोजगार तरुणांना माहिती दिली जाणार असून त्यांचे समुपदेशनही केले जाणार आहे. याशिवाय कौशल्य विकास विभागाच्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, उपजीविकेसाठी कौशल्य संपादन ज्ञान जागरुकता अभियान, किमान कौशल्य विकास कार्यक्रम, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान आदींचीही माहिती दिली जाणार आहे.