ग्रामीण महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ , ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती 

0
44

राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व सर्व राज्य पुरस्कृत आवास योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महाआवास अभियान (ग्रामीण) ला ५ जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राज्यातील पात्र लाभार्थ्यांना पावसाळ्यापूर्वी गृहप्रवेश करता यावा तसेच घरकुलासोबतच शासनाच्या इतर योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावावे यासाठी हा निर्णय घेण्यात येत असून उर्वरित घरकुलांचे काम गुणवत्तापूर्ण आणि जलदगतीने पूर्ण करण्यात यावे; अशा सूचना सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय आवास दिन २० नोव्हेंबर २०२० पासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरु झालेल्या व १ मे २०२१ पर्यंत राबविण्यात आलेल्या या अभियानाची वाटचाल यशस्वीरित्या सुरू असून या कालावधीत सुमारे ७ लाख ५० हजार घरकुलांची बांधकामे हाती घेण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत ३ लाख ५० हजार घरकुले पूर्ण झाली असून ३ लाख ९९ हजार घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. अभियानास आता ५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.