टीमवर्क अन योजनेबद्दलच्या आपलेपणातून समृद्ध गावांची निर्मिती शक्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
29

मुंबई: टीमवर्क आणि योजनेबद्दलच्या आपलेपणातून समृद्ध गावांची निर्मिती करणे शक्य आहे. पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण आणि आर्थिक समृद्धीच्या वाटेवर मार्गस्थ झालेल्या गावांचे, गावकऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. तसेच शासन या सर्व कामात त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

22 मार्चच्या जागतिक जलदिनाचे औचित्य साधून पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा (पहिला टप्पा) गौरव सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. जलक्रांतीतून हरितक्रांती येणार आहे आणि हरितक्रांतीतून सुबत्ता. पण हे कुणा एकाचे काम नाही तर ते सर्वांनी एकत्र येऊन करावयाचे काम आहे असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,  पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची शास्त्रशुद्ध साठवणूक, पाणी वापर, पाणी नियोजन, पिक पद्धती, पौष्टिक गवताची निर्मिती अशा सर्व महत्त्वाच्या विषयांचा संस्कार आणि शिक्षण देण्याचे काम पाणी फाउंडेशनने केले. यातली प्रयोगशीलता समजून सांगितली. पाण्याचा जमिनीखालचा सातबारा कसा मोजायचा हे समजावून सांगितले. शिक्षणाबरोबर संस्कार महत्त्वाचा असतो. पाणी नियोजनाचा हा संस्कार गावाला आणि महाराष्ट्राला समृद्ध करणार असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.