देशातील कोरोना परिस्थितीवर केंद्राने ठोस असा राष्ट्रव्यापी निर्णय घ्यावा- नवाब मलिक

0
26

देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता मागील १५ महिन्यांत केंद्र सरकारने त्या त्या वेळी आवश्यक निर्णय घेतलेले नाहीत. निर्णय घेतेवेळी देखील योग्य ते निर्णय घेतले गेले नाहीत. मागच्या वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा जागतिक स्तरावर आरोग्यविषयक आणीबाणी घोषित करण्यात आली, तेव्हा केंद्रीय आरोग्य मंत्री सांगत होते की, भारतात कोरोनाचा प्रभाव दिसणार नाही. त्यानंतर मार्च महिन्यात रुग्णसंख्या कमी असताना तीन ते चार महिन्यांचा लॉकडाऊन पंतप्रधानांनी घोषित केला. मात्र सध्या दररोज लाखो कोरोनाचे रुग्ण आढळत असताना लॉकडाऊन न लावण्याची भूमिका घेतली जात आहे. देशपातळीवर रोज चार लाखांच्या आसपास रुग्ण आढळत आहेत. अशावेळी राज्यांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही. केंद्र सरकारने काहीतरी ठोस असा राष्ट्रव्यापी निर्णय घ्यावा, तरच कोरोना महामारी नियंत्रित होऊ शकेल, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मांडली आहे.