देशात 24 तासात ५०,९११ नव्या रुग्णांची नोंद, ८७ टक्क्यांनी घटले रोज आढळणारे रुग्ण

0
30

कोरोना संसर्ग थांबण्याची सुखद मालिका सुरू आहे. देशात रविवारी ५०,९११ नवे रुग्ण आढळले. ते ४ लाखांच्या उच्च पातळीहून ८७% कमी आहेत. ही पातळी ५ एप्रिल, म्हणजे ७७ दिवसांनी आली. महत्त्वाचे म्हणजे रविवारी फक्त तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्रात ५ हजारहून अधिक रुग्ण आढळले, तर दुसरीकडे मोठ्या लोकसंख्येच्या यूपी, बिहारसह ११ राज्यांत ३०० हून कमी रुग्ण आढळले. रविवारी देशात संसर्गाचा दरही (टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट) ३% च्या जवळ पोहोचला. एक महिन्यापूर्वी १७ मे रोजी तो १५%हून अधिक होता.

म्हणजे, तेव्हा दर १०० चाचण्यांत १५ हून अधिक रुग्ण आढळत. आता फक्त ३ आढळताहेत. कोरोनाविरुद्धच्या युद्धात सोमवारी मध्य प्रदेश, हरियाणासह काही राज्यांत “मेगा व्हॅक्सिनेशन डे’ साजरा होईल. मध्य प्रदेशात सोमवारी १० लाख डोसचे लक्ष्य आहे. आंध्र प्रदेशने रविवारीच १३ लाख डोस देऊन मेगा व्हॅक्सिनेशन डे साजरा केला. केंद्र सरकारनुसार, राज्यांकडे सध्या ६.३५ कोटी डोस शिल्लक आहेत. मंगळवारपर्यंत २५ लाख डोस आणखी मिळतील. पुढील महिन्यात जुलैमध्ये देशात लसींचे १७ कोटी डोस तयार होतील.