प्रलंबित प्रश्नबाबद प्रविण दरेकरांची विधान परिषद सभापतींकडे आग्रही मागणी, म्हणाले…

0
37

मुंबई: जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी अर्धा-तास चर्चा आणि लक्षवेधीचे कामकाज अधिवेशनात घ्यावे, अशी आग्रही मागणी काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांनी सभागृहातच सभापती महोदयांना केली.
25 फेब्रुवारी, 2021 ला झालेल्या कामकाज सल्लागार समितीने हे कामकाज न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीमध्येही या निर्णयाला दरेकर आणि अन्य भाजपाच्या सदस्यांनी विरोध केला होता. आज सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर दरेकरांनी या बाबीकडे सभापतींचे व सभागृहाचे लक्ष वेधले. हा मुद्दा मांडत असताना दरेकरांनी हे लक्षात आणून दिले की, एका सभागृहाचा संदर्भ दुसऱ्या सभागृहात म्हणजे विधानपरिषदेचा संदर्भ विधानसभेत वापरला जात नाही, तशी प्रथाच नाही. परंतु, कामकाज सल्लागार समितीच्या इतिवृत्तात संसदेचा संदर्भ देऊन शोक प्रस्तावावर सभापतींशिवाय अन्य कुणाही सदस्याला बोलता येणार नाही, असे नमूद केले आहे. ते पुढे असे म्हणाले की, तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, अर्धा-तास चर्चा ही आयुध विशिष्ट प्रकारची आहेत. या माध्यमातून जनतेचे तातडीचे प्रश्न सभागृहाच्या माध्यमातून सरकारपुढे मांडण्याची व सरकारकडून उत्तरे प्राप्त करुन घेण्याची संधी सन्माननीय सदस्यांना मिळत असते.

करोनामुळे गेल्या 4 अधिवेशनात तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, अशासकीय कामकाज झालेले नाही. राज्यापुढे अनेक तातडीचे प्रश्न आहेत, अनेक मोर्चे गावोगावाहून अपेक्षेने मुंबईत आले आहेत, अनेक आंदोलने होत आहेत व त्यांनाही या सभागृहाकडून अपेक्षा आहेत. 1 मार्च ते 10 मार्चपर्यंत होणाऱ्या या अधिवेशनात इतर सर्व कामकाज होत असताना अर्धा-तास चर्चा व लक्षवेधीचे कामकाज न घेणे योग्य ठरणार नाही. त्यांनी सभागृहात सभापती महोदयांना अशी विनंतीही केली की, महाराष्ट्रातील सर्व घटकांचे तातडीचे प्रश्न सुटावेत यासाठी आपण आपल्या अधिकारात या संपूर्ण सत्रात लक्षवेधी सूचना व अर्धा-तास हे कामकाज घेण्याबाबत निर्णय घ्यावा. दरम्यान दरेकर यांनी सभागृह संपल्यानंतर सभापती महोदयांची त्यांच्या दालनात भेट घेतली व हे कामकाज घेण्याबाबत त्यांना लेखी पत्र देखील दिले आहे

  • जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी अर्धा-तास चर्चा आणि लक्षवेधीचे कामकाज घ्या
  • प्रविण दरेकरांची विधान परिषदेच्या सभापतींकडे आग्रही मागणी