बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करावी – दादाजी भुसे

0
38

मुंबई: महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या संरक्षण दलातील सर्व माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा पत्नींना ग्रामविकास आणि नगरविकास विभागामार्फत मालमत्ता करातून सूट देणारी मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना राज्यात राबविली जात आहे. या योजनेची अंमलबजावणी परिणामकारकपणे करावी, असे निर्देश माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

या योजनेसंदर्भात आढावा घेण्यासाठी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागाच्या सचिव सीमा व्यास, उपसचिव सरिता बांदेकर-देशमुख, नगरविकास, ग्रामविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील ग्रामस्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याबाबत ग्रामविकास विभागाने ऑगस्ट 2020 मध्ये तर नगरविकास विभागाने सप्टेंबर 2020 मध्ये निर्णय घेतला. या दोन्ही विभागांच्या आदेशांचे एकत्रिकरण करुन बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेंतर्गत माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याबाबत नोव्हेंबर 2020 मध्ये स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.