भारतीय संत साहित्य शाश्वत, चिरंतन व आनंददायक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0
23

मुंबई :- इतिहास ज्याप्रमाणे वेगवेगळ्या कालखंडात विभाजित केला जातो, तसे साहित्य आणि विशेषतः संतसाहित्य कालखंडात विभाजित करता येत नाही. संत साहित्य मग ते हिंदी भाषेतील असो, मराठी, कन्नड, ब्रज, मिथिली, अवधी भाषेतील असो, त्यातील भक्तिभाव समान असतो. भारतीय साहित्य शाश्वत, चिरंतन व आनंददायी असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. करुणाशंकर उपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘मध्यकालीन कविता का पुनर्पाठ’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

प्रकाशन सोहळ्याला ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक, भागवत परिवाराचे अध्यक्ष डॉ. वीरेंद्र याज्ञिक व ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते.

संत साहित्य गोस्वामी तुलसीदासांचे असो, समर्थ रामदासांचे असो किंवा जैन मुनींचे असो, त्यातील प्रस्तुतीकरण वेगवेगळे असले तरीही त्यातील आनंद तोच असतो. हाच आनंद रामायण धारावाहिक पाहतानादेखील येतो. देशात अनेकदा परकीय आक्रमणे झाली परंतु देशातील साहित्य सागर कधीही आटला नाही व आटणार नाही, असे राज्यपालांनी सांगितले.

‘मध्यकालीन कविता का पुनर्पाठ’ हे पुस्तक भारतीय साहित्याच्या पुनरूत्थानाचे कार्य करेल, असे सांगून हे पुस्तक साहित्यिक, टीकाकार व पत्रकार सर्वांना उपयुक्त सिद्ध होईल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.