रक्तदात्यांमुळे चंद्रपूर जिल्ह्याचा लौकिक वाढला – विजय वडेट्टीवार

0
36

 ‘माणूस द्या, मज माणूस द्या’ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगून गेले. जात, धर्म, पंथ या सर्वांहून एखाद्या गरजू रुग्णाला रक्त देणारा माणूसच सर्वश्रेष्ठ आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त वेळा रक्तदान करणारे दाते आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असून या रक्तदात्यांमुळेच जिल्ह्याचा लौकिक वाढला, असे गौरवोद्गार आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काढले.

प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित रक्तदाते व रक्तदान शिबिराचे आयोजन करणा-या संस्थांचा सत्कार करतांना ते बोलत होते. कोरोना महामारीच्या संकटात अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमाविले आहे, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, या काळात मोठ्या प्रमाणात रक्ताची आणि प्लाझमाची गरज निर्माण निर्माण झाली. यासाठी अनेक नागरिक, संस्था समोर आल्या. रक्तदानातून जिल्ह्यात सामाजिक दायित्वाचे दर्शन झाले. रक्तदान करणारी माणसे अनोळखी असतात. मात्र काहीही न बघता संकटाच्या वेळेस इतरांना वाचविण्याची त्यांची वृत्ती असते. जिल्ह्यात अनेकांनी 100 पेक्षा जास्त वेळा रक्तदान करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे जास्तीत जास्त रक्तदान करून दुस-याचा विक्रम तोडण्याची स्पर्धा ही समाजाच्या हिताची आहे. अशा रक्तदात्यांचा आपल्या सर्वांना गर्व आणि अभिमान आहे. रक्तदान केल्यामुळे एखाद्याचा जीव आपण वाचवू शकतो, याचे मानसिक समाधान वेगळेच असतो. विशेष म्हणजे सातत्याने रक्तदान केल्यामुळे रक्तदात्याचे हृदयसुध्दा मजबूत होते. अशा व्यक्तिंना हृदयाचे विकार होण्याची शक्यता कमी असते. कोरोनाकाळात जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, सामाजिक संघटना आदींनी अतिशय मोलाचे काम केले, असे पालकमंत्री म्हणाले.