राज्यातील दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणार: धनंजय मुंडे

0
44

राज्यातील दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गास राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मोठी ‘गुड न्युज’ दिली आहे. विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात मुंडेंनी दिव्यांग शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याची अंमलबजावणी दोन महिन्यांच्या आत करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. 
शिक्षकांना देण्यात येणारे समकक्ष वाढीव अनुदान, भत्ते यांसह अन्य प्रश्नांसाठी अर्थ व नियोजन खात्याचे मंत्री अजितदादा पवार यांच्यासह अन्य विभागांसमवेत व्यापक बैठक घेतली जाईल. तसेच ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासंदर्भातील सर्व अडसर दूर करून दोन महिन्यांच्या आत ७ वा वेतन आयोग लागू करण्यात येईल अशी माहिती धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत बोलताना दिली.
अधिवेशनानंतर पंधरा दिवसांच्या आत संबंधित विभागांसोबत व्यापक बैठक घेऊन हे अडसर दूर करून येत्या दोन महिन्यांच्या आत सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मुंडेंनी विधान परिषदेत घोषित केले. यावेळी प्रश्न उपस्थित केलेल्या सर्वच आमदार महोदयांनी मुंडेंच्या या निर्णयाचे स्वागत केले.