राज्यात लॉकडाऊनची शक्यता, जाणून घ्या बैठकीतील निर्णय 

0
22

मुंबई : राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या. यासंदर्भात आज आयोजित या महत्त्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना 50 टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी, अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या.

बैठकीतील निर्णय

मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. त्याची कार्यपद्धती ( एसओपी) मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी. जेणेकरून नियोजनबद्धरीतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल.

ऑक्सिजनची महत्त्वाची भूमिका असल्याने तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावा.

गृह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरण करण्यावर भर द्यावा.

पुढे मृत्यू वाढू शकतील त्यामुळे ई आयसीयू,व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे.

प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी.

विशेषत: वृद्ध व सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत.

सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीतून काम करू द्यावे.