शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न

0
28

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर नेवासा तालुक्यात शाई फेकण्याचा प्रयत्न झाला. मात्र, शाई फेकण्यासाठी आलेले वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संजय सुखदान यांना पोलिसांनी वेळीच रोखल्याने त्यांना बाटली घेऊन लोखंडे यांच्यापर्यंत जाता आले नाही. त्यानंतर त्यांची लोखंडे यांच्याशी चर्चा घडवून आणण्यात आली. लोखंडे यांनी करोना काळात नेवासा तालुक्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत सुखदान यांनी हे आंदोलन केले. त्यानंतर झालेल्या चर्चेत सुखदान यांनी जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधींच्या कामांची उदाहरणे देत लोखंडे यांना धारेवर धरले.
नेवासा येथील पंचायत समितीच्या सभागृहात गुरुवारी लोखंडे यांनी बैठक घेतली. यासाठी अधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. बैठक सुरू असताना सुखदान शाईची बाटली घेऊन लोखंडे यांच्या दिशेने निघाले. त्यांना पोलिसांनी मध्येच अडविले. त्यांच्याकडील बाटली काढून घेतली. त्यावेळी पोलिसांसोबत त्यांची बाचाबाचीही झाली. कोरोना काळात खासदार म्हणून तुम्ही नेवासा तालुक्यात काय काम केले, काय दिलासा दिला, असे प्रश्न विचारून सुखदान यांनी लोखंडे यांना धारेवर धरले.
तालुक्यातील सध्याची स्थिती, प्रशासनाचा कारभार याची माहिती देत सुखदान यांनी यात लक्ष घालण्याची मागणी लोखंडे यांच्याकडे केली. यामुळे बैठकीत काही काळ गोंधळ उडाला होता. आपले म्हणने मांडून झाल्यानंतर सुखदान तेथून निघून गेले. त्यानंतर लोखंडे यांनी बैठक पूर्ण केली.