सांगली जिल्ह्यात 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन – जयंत पाटील 

0
30

राज्यात ‘ब्रेक द चेन’ निर्बंधांची अंमलबजावणी 15 मे 2021 पर्यंत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून जिल्ह्यातही 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन पाळण्यात येईल. त्यानंतर राज्य शासनाच्या भूमिकेनुसार जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचे मत लक्षात घेऊन जिल्ह्यासंदर्भात पुढील निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 सद्यस्थितीचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील वाढती रूग्णसंख्या, बेडची उपलब्धता, व्हेंटिलेटरची उपलब्धतता, लसीकरण, लॉकडाऊन अंमलबजावणी आदी सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेतला. आणखी व्हेंटीलेटर्स वाढविण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी एकमुखाने मागणी केली. यावर बोलताना पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्हेंटीलेटर बेड उपलब्धतेबाबत कॉल सेंटरला त्वरीत माहिती उपलब्ध झाली पाहिजे व रूग्णाला व्हेंटीलेटर बेड उपलब्ध झाला पाहिजे यासाठी यंत्रणांमध्ये अत्यंत काटेकोर समन्वय असणे आवश्यक आहे. जिल्ह्याला दोन दिवसांमध्ये अधिकचे 30 व्हेंटीलेटर्स उपलब्ध होणार असून राज्य शासनाकडे आणखी 20 ते 25 व्हेंटीलेटर्सची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्याला आवश्यकतेनुसार व्हेंटीलेटर्सची त्वरीत खरेदी करावी. खरेदी प्रक्रियेपेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे त्यामुळे नागरिकांच्या जीवाला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगून व्हेंटीलेटर्सची तात्काळ खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी, असे सांगितले.

लसीकरणाचा आढावा घेत असताना पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात आत्तापर्यंत 5 लाख 98 हजार 386 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला डोस 5 लाख 17 हजार 92 तर दुसरा डोस 80 हजार 794 जणांचा झाला आहे. ज्यांचा पहिला डोस झाला आहे अशांना विहीत मुदतीत दुसरा डोस द्यावा. त्यासाठी आवश्यक असणारे लसीकरणाचे डोस मिळविण्यासाठी कटाक्षाने प्रयत्न करू, असे सांगितले. लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायतीत नोंदी करून जेवढे डोस उपलब्ध आहेत तेवढ्याच लोकांना लसीकरणासाठी बोलवावे व गर्दी टाळावी, असे निर्देशित केले.