‘हिंमत असेल तर अहमदाबादचे कर्णावती करून दाखवा’; मोदी, शाह यांना आव्हान

0
46

मुंबई: महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराचा वाद पेटला असताना गुजरातमधील अहमदाबादवरून शिवसेनेने थेट पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान दिले आहे. ‘अहमदाबाद’ चे नामांतर ‘कर्णावती’ करुन दाखवावे, असे आव्हान शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी दिले आहे.

शिवसेनेच्या मालाड येथे झालेल्या शिवसेनेच्या गुजराती भाषिकांच्या मेळाव्यात अहमदाबादचे नामांतर कर्णावती करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. अहमदाबादला कर्णावती हे नाव आहे. मात्र हे नाव सरकारदरबारी अधिकृत करण्यात आलेले नाही. तेथील जनता अजूनही अहमदाबादला कर्णावती म्हणून ओळखते. दुसरीकडे महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार 1995 साली सत्तेत आल्यानंतर औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्यात आले. मात्र काही नतद्रष्ट लोकांनी न्यायालयात धाव घेतली होती म्हणून ती नावे अंमलात येऊ शकली नाहीत, याची आठवण देखील हेमराज शाह यांनी करून दिली.