अर्थसंकल्पीय अधिवेशन: देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका 

0
24

मुंबई: वरळीमध्ये एक पब रात्रभर सुरू होता यावरून देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला आहे.राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानभवन परिसरात फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता वरळीतील नाईट लाईफच्या अनुषंगाने टीका केली. ते म्हणाले, “वरळीच्या लोकप्रतिनिधीनीनेच नाईट लाईफ सांगितल्याने, तिथे रात्रभर पब चालू आहेत, कुठलेही सोशल डिस्टंन्सिंग नाही. सोशल डिस्टंन्सिंग शिवजयंतीसाठी. यातून सरकारचा खरा चेहरा समोर येतोय.” तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेनंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पबवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

“मुख्यमंत्र्यांचे सल्ले त्यांचे मंत्री ऐकत नाहीत,” अशी टीका देखील महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.फडणवीस म्हणाले, “मुख्यमंत्री जनतेला आणि विरोधकांना सल्ला देतात. आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना सल्ला दिला, तर ते अधिक उचित होईल. अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतात. म्हणून ते स्वत:चे निर्णय स्वत:च घेतात. मुख्यमंत्र्यांचे सल्ले त्यांचेच मंत्री धुडकावतात, अशी स्थिती आहे.”