महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द;निधीवाटपात कोणत्याही विभागावर अन्याय नाही – अजित पवार

0
38

मुंबई – महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटीबध्द असून विकासनिधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘कारोना’ संकटाचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांसह सर्व घटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेचा उत्तर देताना, सदस्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिल्याबद्दल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपमुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन केले.

विधानपरिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यावर आलेल्या ‘कोरोना’च्या अभूतपूर्व संकटाचा सामना महाविकास आघाडी सरकारने अत्यंत धीराने आणि संयमाने मुकाबला केला. या लढ्यात राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडीकल स्टाफ, पोलीस, सफाई कामगार, आशा वर्कर, अंगणवाडीताईंसह अत्यावश्यक सेवेतील सर्व कोरोना योध्दांनी पहिल्या फळीत राहून, जोखीम पत्करुन लोकांचे जीव वाचवले. लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांसह राज्यातल्या नागरिकांनी सरकारला समर्थपणे साथ दिली, त्यामुळेच राज्यातला कोरोना नियंत्रित राहू शकला, असे सांगत या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

राज्यावरील ‘कोरोना’चे संकट अद्याप पुर्णपणे संपलेले नाही. त्यामुळे या संकटाचा सामना करताना मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसुत्रीचा वापर सर्वांनी कायम ठेवण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.‘कोरोना’ संकटकाळात सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस, अन्न व नागरी पुरवठा, अशा महत्वाच्या विभागांच्या निधीला कोणत्याही प्रकारची कात्री लावण्यात आली नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

‘कोरोना’ काळात राज्यभरात जंबो कोविड सेंटर, उपचार केंद्रासह आरोग्यविषयक कामांना निधी कमी पडू दिला नाही, हेदेखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.‘कोविड’ संकटातून सावरण्यासाठी, राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी, बांधकाम क्षेत्राला उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी मुद्रांक शुल्क कमी करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य शासनाच्यावतीने घेण्यात आला. या निर्णयामुळे घरखरेदीचे व्यवहार वाढले. सर्वसामान्यांचे घर खरेदीचे स्वप्न साकार होण्यासही यामुळे मदत झाली.

राज्यात वैधानिक विकास मंडळे अस्तित्वात नसली तरी ही मंडळे अस्तित्वात आहेत असे गृहीत धरुन निधीचे वाटप ठरलेल्या सुत्रानुसारच करण्यात येईल. विदर्भ-मराठवाड्यासह उर्वरीत महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असून राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. ‘कोराना’मुळे राज्य आर्थिक अडचणींचा सामना करत असताना केंद्राकडे ‘जीएसटी’च्या परताव्याची ३२ हजार कोटींची थकबाकी आहे, अशा संकटाच्या काळात केंद्र सरकारने ही थकबाकी तातडीने देण्याची अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

‘कोरोना’ काळात आर्थिक संकटाचा सामना करत असतानासुध्दा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरु ठेवली. त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबतही सरकार सकारात्मक निर्णय घेईल. राज्यात कोणत्याही घटकावरील अन्याय, अत्याचार तसेच गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.