मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी तातडीने गुन्हे दाखल करा !- नाना पटोले

0
35

मुंबई: दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्तेचा मुद्दा नाना पटोले यांनी आज विधिमंडळात उपस्थित केला. आदिवासी समाजाचे डेलकर हे सातवेळा खासदार म्हणून निवडून आले. त्यांना प्रचंड मरण यातना देण्यात आल्या. आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न केले पण शेवटी मुंबईत येऊन जीवनयात्रा संपवली. त्यांच्या १५ पानाच्या सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांच्यावर अजून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या प्रस्तावावर नाना पटोले विधानसभेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, खा. मोहन डेलकर यांनी त्यांच्या व्यथा पंतप्रधान, गृहमंत्री आणि संसदेतही मांडल्या. त्यांना कशाप्रकारे त्रास दिला गेला हे त्यांच्या १५ पानी सुसाईड नोट मधील वर्णन वाचले तर अंगावर काटे येतील. या सुसाईड नोटमध्ये गुजरातचे माजी गृहमंत्री प्रफुल्ल खोडा पटेल यांचे नाव आहे. त्यांना भाजपाने दादरा नगर हवेलीचे प्रशासक म्हणून बसवले आहे. या प्रकरणात कोणी कितीही मोठे असले तरी ते कायद्यापेक्षा माठे नाहीत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

धानाच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, शेतकऱ्याचे धान सरकारने खरेदी करून त्याचे समर्थन मुल्य दिले पाहिजे. शेतकरी कर्जमाफी करताना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन म्हणून देण्याची घोषणी केली होती ते पैसे अजून दिले गेले नाहीत. ते दिले नाहीत तर जे कर्ज थकवतात त्यांनाच कर्ज माफ होते असा चुकीचा संदेश जाईल म्हणून याच बजेटमध्ये ते ५० हजार रुपये देण्याची घोषणा करावी, असे पटोले म्हणाले.