नागपूर: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि त्यांची वर्णी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी लागल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर शिवसेनेचे मुखपत्र सामनातूनही कानपिचक्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचे समोर आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांची खाती बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून यावर तोडगा काढावा असंही त्यांनी स्पष्ट केले. ते नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपा सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या एकनाथ खडसे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात फेरबदल करुन शिवसेनेच्या कोट्यातील कृषीमंत्रीपद खडसेंना दिलं जाणार अशी चर्चा सुरु आहे.