इंधन दरवाढीवरून नाना पटोलेंची बिग बी, अक्षय कुमारवर टीका

0
31

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इंधन दरवाढीवरून बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. युपीएच्या काळात इंधनाचे दर 70 रुपये झाले तेव्हा ट्विटरवरून टीव टीव करणारे कुठे आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आज पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या उंबरठ्यावर असूनही अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार गप्प आहेत. सर्वसामान्यांची लूट होत असताना गप्प बसलेल्या सेलिब्रिटींना योग्य धडा शिकवण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. या सेलिब्रेटींचे पिक्चरचे शुटींग महाराष्ट्रात होऊ देणार नाही असा सज्जड दमही त्यांनी दिला.

काँग्रेस प्रणित युपीएचे सरकार हे लोकशाही मार्गाने चालणारे, संविधानावर चालणारे सरकार होते. त्यामुळेच अमिताभ बच्चन, अक्षयकुमारसह असंख्य सेलिब्रिटी सरकार विरोधातही आवाज उठवत होते. आज या मंडळींनी मोदी सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवणे अपेक्षित असताना ते भाजपाच्या हातचे बाहुले बनले आहेत. महागाई, शेतकऱ्यांवरील अत्याचाराविरोधात आता सेलिब्रिटी बोलत नाहीत म्हणूनच काँग्रेसने या भाजपाच्या पोपटांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे, असे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टी, भाजपाचा आयटी सेल यांनी या आंदोलनाला खलिस्तानी, नक्षलवादी, दहशतवादी म्हणून बदनाम केले त्यावेळीही या सेलिब्रिटींनी मौन पाळले. परंतु भाजपाच्या आयटी सेलच्या सांगण्यावरून त्यांनी शेतकरीविरोधी ट्विट केले. हे सेलिब्रिटी भाजपाच्या आयटी सेलचे पोपट आहेत का? असा सवालही पटोले यांनी विचारला आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर नाना पटोले यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मोदी सरकारवर टीका करण्याची एक संधी सोडत नाही. त्याचबरोबर मोर्चे आणि आंदोलनाच्या माध्यमातून केंद्रातील भाजपा सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे.