नाशिक विभागाची ई-फेरफार प्रणालीमध्ये उल्लेखनीय कामगिरी :विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

0
35

नाशिक– महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रणालीमध्ये प्रलंबित अनोंदणीकृत व नोंदणीकृत फेरफार यांची प्रलंबितता कमी करणेबाबत नाशिक विभागात उल्लेखनीय कामकाज झाले असून नाशिक विभागातील नंदुरबार, अहमदनगर, जळगांव, धुळे व नाशिक हे जिल्हे राज्यात अनुक्रमे एक ते पाच स्थानी आहेत. तसेच नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा राज्यात प्रथम स्थानावर आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे.

ई-फेरफार प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन त्यांचे अधिनस्त अधिकारी कर्मचारी यांच्या कामकाजाचा आढावा नियमित घेण्यात आलेला आहे. नाशिक विभागातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी अथक मेहनत घेऊन राज्यात ई-फेरफार प्रणालीमधील प्रलंबित फेरफार यांची प्रलंबितता कमी करून विभागातील जनतेला दिलासा देणारे कामकाज केले आहे, असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.

महसूल विभागाच्या ई फेरफार प्रकल्पातील सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी सामान्य नागरिकाला सोप जावे म्हणून महाभूमी हे https://mahabhumi.gov.in संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून या संकेतस्थळाच्या आधारे कोणालाही महसूल विभागाच्या सर्व सशुल्क आणि निशुल्क सेवांचा लाभ घेता येणार आहे, अशी माहितीही विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी  दिली आहे.

क्रेडिट: dgipr