गतवर्षी मुंबईतील ‘वीज पुरवठा खंडण’ घटनेच्या अनुषंगाने ऊर्जामंत्र्यांचे दोन्ही सभागृहात निवेदन

0
27

मुंबई : मुंबईतील वीज पुरवठा खंडित झाल्याच्या दि. 12 ऑक्टोबर 2020 च्या घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र सायबर सेलच्या अहवालातील निष्कर्षांबाबतचे निवेदन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत केले.

निवेदनामध्ये माहिती दिली आहे की, गतवर्षी दि. 12 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 10.05 मिनिटांच्या सुमारास मुंबईला विद्युत पुरवठा करणाऱ्या 400 के.व्ही. वाहिन्यांमध्ये बिघाडामुळे तसेच मुंबईस्थित वीज निर्मितीचे (Embedded Generation) प्रमाण कमी असल्यामुळे मुंबई महानगराचा विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे मुंबईचे जनजीवन काही तासांसाठी ठप्प झाले होते.

या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी ऊर्जा विभागांतर्गत तांत्रिक समितीची स्थापना केली. या समितीत आयआयटी मुंबई, व्हीएनआयटी, नागपूर, व्हीजेटीआय, मुंबईमधील तज्ञ प्राध्यापक तसेच ऊर्जा विभागांतर्गत वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त भारत सरकारच्या केंद्रीय विद्युत प्राधिकरण यांनीही दि. 12 ऑक्टोबर 2020 रोजी तज्ञ समितीची नियुक्ती केली. तसेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (एमईआरसी) देखील तज्ञ समितीची नियुक्ती केली.

या व्यतिरिक्त या घटनेमागे घातपाताची शक्यता असू शकते, अशी शंका वाटल्याने या प्रकरणाची चौकशी गृह विभागाच्या महाराष्ट्र सायबर सेलकडून करण्यात यावी, अशी विनंती गृहविभागाला केली होती. त्यानुसार महाराष्ट्र सायबर सेलच्या वरिष्ठ पोलीस महानिरीक्षकांचा अहवाल शासनास दि. 1 मार्च 2021 रोजी सादर करण्यात आला आहे.

सायबर सेलच्या अहवालातील महत्त्वाचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत.

1. विघातक प्रोग्राम्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 14 ट्रोजन हॉर्सनी महापारेषणच्या संगणक प्रणालीत प्रवेश केल्याचे व त्याद्वारे विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी काही ट्रोझन हॉर्सेस यांनी यापूर्वीही जगात अशाप्रकारे मोठे सायबर हल्ले केलेले आहेत.

2. विद्युत पुरवठा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आयटी व ओटी (IT & OT Servers) सर्व्हरच्या फायरवालमध्ये या ट्रोझन हॉर्सेसने सहजतेने प्रवेश केल्याचे आढळून आले आहे.

3. कळवा येथील राज्य भार प्रेषण केंद्रातील (एसएलडीसी) सर्व्हरच्या फायरवॉलमध्ये सायबर सिक्यूरिटी इकोसिस्टीमवर आघात करू शकतील तसेच रचना कार्यपद्धतीमध्ये बिघाड करू शकतील अशा प्रकारच्या संशयास्पद विघातक कोडस् व सॉफ्टवेअर प्रोग्राम्सनी सहजतेने प्रवेश केल्याचे आढळून आले.

4. एका मिनिटापेक्षा कमी अवधीत 3 अलार्मस् आयटी सिस्टममधून देण्यात आले. तथापि त्याकडे लक्ष देण्यात आले नाही, ही बाब सायबर हल्ला झाल्याची शक्यता दर्शवतात.

5. विदेशातील विशेषतः संशयास्पद व ब्लॅकलिस्टेड असलेल्या इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेसवरुन (IP Address) राज्य भार प्रेषण केंद्राच्या (एसएलडीसी) सायबर सर्व्हरमध्ये लॉगईन करणे, यंत्रणा हॅक करणे, यंत्रणेस विघातक ठरतील या प्रकारचे प्रयत्न वारंवार केले असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारचे इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस संशयास्पद आणि विघातक असल्याचे महत्त्वाच्या क्रेडिट रेटींग एजंसींनी प्रमाणित केले आहे