दलितांवरील हल्ले थांबवा – रामदास आठवले यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

0
30

नांदेड – सध्या दलितांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढतच आहेत. दलितांवरील हल्ले थांबविण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. दलितांवरील हल्ले थांबविण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले.

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील शिवनी जामगा या गावात संदीप दुधमल या बौद्ध कुटुंबावर सामूहिक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी असणारे एडके हे औरंगाबादमधील के आर एल हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. के आर एल हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जखमी एडके यांच्या प्रकृतीची ना.रामदास आठवले यांनी चौकशी केली. जखमी गणेश एडके यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

या प्रकरणी योग्य कलम दाखल करून सर्व आरोपींना त्वरित अटक केली आहे. याप्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नाही.आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल अशी माहिती नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी ना रामदास आठवले यांना दिली. या प्रकरणी सामाजिक न्याय विभागातर्फे पीडित दलित कुटुंबाला 4 लाखांची मदत जाहीर झाली असून त्या पैकी 1लाख रुपयांचा चेक आज देण्यात आला.

तसेच जातीभेद मिटले पाहिजेत. दलित सवर्ण एकजूट व्हावी असे आमचे प्रयत्न आहेत.दलित सवर्ण गावात एकजुटीने राहावेत हा आमचा प्रयत्न असला तरी जातिभेदातून जातीय द्वेषातून दलितांवर सामूहिक हल्ले होण्याचे प्रकार राज्यात होत आहेत.दलितांवरील वाढते हल्ले मुख्यमंत्र्यांनी थांबवावेत असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले.