उन्नावमध्ये दोन मुलींचे शव आढळले तर तिसऱ्या मुलीचीही प्रकृती नाजूक

0
62

उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन अल्पवयीन मुली चारा घेऊन जाण्यासाठी शेतात गेल्या होत्या. मुलींच्या काकांना कोणी तरी सांगितलं की, तिन्ही मुली शेतात पडलेल्या आहेत. काकांनी त्याठिकाणी धाव घेतली असता, त्यांची परिस्थिती पाहता त्यांना तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यातील दोन मुलींना मृत घोषित केलं. तिसऱ्या मुलीची प्रकृतीही गंभीर असून, तिच्यावर कानपूरच्या रिजेंसी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडित मुलींच्या आई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींच्या तोंडातून फेस निघत होता. 6 पोलिसांची टीम या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान गावकरी हे आंदोलनाला बसले असून, पीडितेंच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बसवू नये, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. पीडितेंच्या परिवाराला न्याय मिळायला हवा अशी मागणी करत परिवाराला कोणालाही भेटू दिलं जात नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

याप्रकरणी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केंद्र सरकारला जखमी मुलीसाठी आरोग्य सेवा पुरवण्याची मागणी केली आहे. जेणेकरुन आरोपीला कठोर शासन करता येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सोबतच, उत्तर प्रदेशात दलित सुरक्षित नाही, त्यामुळे राष्ट्रपती राजवट तात्काळ लावा, असंही खरात यांनी म्हटलं आहे.