उल्हास नदीतील जलपर्णीवर लवकरच तोडगा; मंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

0
36

कल्याण -ठाणे जिल्ह्यातील बव्हंशी नागरी भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत दरवर्षी उद्भवणाऱ्या जलपर्णीच्या समस्येवर जैव तंत्रज्ञानाच्या साह्याने कायमस्वरुपी तोडगा काढण्यात येत असल्याची ग्वाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नदीतील जलपर्णी जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने नष्ट करून पाणी शुद्ध करण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहे.

उल्हास नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिका यांच्या माध्यमातून एसटीपी उभारले जात आहेत. खेमाणी येथील एसटीपीचे काम पूर्ण झाले असून कल्याण-डोंबिवली हद्दीतील ५ एसटीपीचे काम मे अखेरीपर्यंत पूर्ण होणार आहे. म्हारळ नाल्यावरही एसटीपी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नाल्याच्या मुखाशी बांध घालून सांडपाणी थेट नदीत मिसळणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे नितीन निकम, कैलास शिंदे आणि उमेश बोरगावकर आंबिवली नजीक उल्हास नदीजवळ आंदोलनाला बसले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी त्यांची भेट घेतली. याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उल्हासनगर महापालिका आयुक्त ए. एन. राजा, जिल्हा परिषद सीईओ, तसेच सगुणा बागेचे प्रगतिशील शेतकरी व मायक्रोबायॉलॉजिस्ट शेखर भडसावळे, आमदार विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे आदी उपस्थित होते.