बेस्टच्या ४५० कोटीची ग्रॅच्युइटी कधी देणार?,अतुल भातखळकरांचा प्रश्न

0
28

मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला बेस्ट उपक्रम मागील अनेक वर्षांपासून तोट्यात जात असताना सुद्धा विकासकांकडे असलेली सुमारे 160 कोटीं रुपयांची थकबाकी वसूल करायची नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र बेस्टकडे पैसे नसल्याचे कारण पुढे करत 3500 बेस्ट कर्मचाऱ्यांची सुमारे 450 कोटी रुपयांची ग्रॅच्युइटी मागील अनेक महिन्यांपासून द्यायची नाही अशी दुटप्पी भूमिका ठाकरे सरकारकडून घेतली जात आहे, हे अन्यायकारक व बेकायदेशीर असून या सर्व कर्मचाऱ्यांची थकीत ग्रॅच्युइटी कधी देणार असा प्रश्न भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्व चे आमदार अतुल भातखळकर यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून विधानसभेत केला.

कायद्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी वेळेत अदा करणे बंधनकारक आहे, असे असताना सुद्धा बेस्ट प्रशासनाने मागील तीन महिन्यांपासून 3500 कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी अद्याप दिली नाही. बेस्टच्या हक्काचे 160 कोटी रुपयांची थकबाकी कनाकिया स्पेसेस, कनाकिया किंग स्टाईल प्रा.लि., घैसास इस्टेट, विजय असोसिएस्ट्स, विनिता इस्टेट आणि केएसएल इंडस्ट्रीज लि. या सहा विकासकांनी अद्याप दिलेली नाही. यात धक्कादायक बाब म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या लेखापरीक्षकांनी ही रक्कम 160 कोटींपेक्षा अधिक असल्याचे सांगून सुद्धा ती नाकारण्याचे काम बेस्ट प्रशासनाने केले, हे अत्यंत निंदनीय असून या 6 विकासकांना पाठीशी घालण्याचे काम बेस्ट प्रशासनाकडून केले जात असल्याची टीका करतानाच या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी सुद्धा आमदार भातखळकर यांनी केली आहे.

या वेळी विचारण्यात आलेल्या एकही प्रश्नाला मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट व समाधानकारक उत्तर दिले नसल्यामुळे या सर्व 3500 कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या ग्रॅच्युइटी पासून दूर ठेवण्याचा बेस्ट प्रशासन व ठाकरे सरकारचा डाव असल्याचा आरोप सुद्धा आमदार भातखळकर यांनी केला आहे.